लोकसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार असून, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे अंबादास दानवे पुढील दोन- तीन दिवसांत मोठा निर्णय देखील घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांचं तिकीट जवळपास निश्चित झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे थेट मातोश्रीवरून दानवे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबतच वृत्त ‘लोकमत’ ने दिले आहे. महाविकास आघाडीतील एक मोठा नेता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले आहे, सोमवारी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी काल(१५ मार्च ) रोजी माध्यमांशी बोलताना केले होते.
आहातच आज आंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली, मी मागच्या दहा वर्षांपासून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. मी माझी इच्छा लपवून ठेवलेली नाही. पक्षप्रमुखांनाही हे माहीत आहे. अजूनही कोणताही चेहरा त्यांनी दिलेला नाही. निर्णय घ्यायला अवधी आहे. मी इच्छा व्यक्त केली आहे. आता ते कुणाला उमेदवारी देणार ते पाहू. एकच बाजू चालत असेल आणि एकांगीपणे कुणी वागत असेल तर त्याची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे. चंद्रकांत खैरे मला कायम डावलत असतात, ही गोष्ट आजची नाही. मी चंद्रकांत खैरेंसाठी पक्षाचं काम करत नाही उद्धव ठाकरेंसाठी काम करतो. खैरे काय म्हणतात, माझ्याविषयी काय बोलतात त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
मी पक्ष सोडण्याच्या ज्या काही चर्चा सुरु आहेत. त्याला काही अर्थ नाही. तिकीट मिळणं न मिळणं, यापेक्षा संघटनेच्या विचारांना मानणारा मी शिवसैनिक आहे. संघटनेच्या प्रमुखांकडे हट्ट करण्याचा, आग्रह धरण्याचा माझा अधिकार आहे. त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण, त्यांनी जे आदेश देतील त्याचं पालन करण्यास आम्ही बांधील आहोत, असंही अंबादास दानवे म्हणाले.
