लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सर्व शिक्षण संस्थेतील कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा, याबाबत शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार/चुडीदार, कुर्ता तसेच पुरूष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पँट परिधान करावी. जीन्स टी शर्ट चालणार नाही किंबहुना चित्रविचित्र नक्षीकाम असलेले शर्ट नको, असे शालेय शिक्षण विभागाने बजावले आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील पुरूष व महिला शिक्षकांसाठी संबंधित शाळा ड्रेसकोडचा रंग निश्चित करेल. त्यानंतर या ड्रेसकोडचे पालन करणे बंधनकारक राहील असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. शिक्षक भावी पिढी घडवत असतात, जनमानसात त्यांच्याकडे गुरू, मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. शिक्षकांचा संबंध विद्यार्थी, पालक, प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. त्यामुळे अध्यापनाचे काम करताना आपला पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल, याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. शिक्षकाचा पेहराव अशोभनीय, अव्यवस्थित आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, तसेच विद्यार्थ्यांवर होतो असे नमूद करून शिक्षकांच्या पेहरावासंदर्भातील मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या.
सरकारने केवळ कपडेच नाही तर महिला व पुरुष शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या चप्पल घालाव्यात याबाबत देखील निर्णय घेण्यात आला आहे. या शासन पत्रकात शिक्षकांनी कुठले बूट घालावेत. कशा चपला घालाव्यात महिला शिक्षकांच्या चपला कशा असाव्यात याबाबत नियमावली देण्यात आली आहे.
एकीकडे सरकारने शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू केला असेल तरी दुसऱ्या बाजुला त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असल्याने शिक्षकांच्या नावाच्या आधी इंग्रजीत टीआर (Tr) आणि मराठीत टि असे संबोधन लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिक्षकांच्या वाहनावर देखील हे संबोधन आणि त्याअनुरूप बोधचिन्ह देखील लावण्याची परवानगी देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षकी पेशा आता स्टेटस सिम्बॉल होणार आहे.
