पुण्यात एनआयएची मोठी कारवाई; दहशतवादी कारवायांसाठी वापरलेली इमारत सील

मुंबई-पुण्यासह गुजरातमधील महत्वाच्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढव्यातील बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोंढव्यात दहशतवादी वास्तव्यास असलेली इमारत सील केली.

या सगळ्या प्रकरणाचा तपास एनआयए कडून सुरू आहे. आरोपींनी कोंढवा भागातील घरात राहू बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचत होते. त्यांनी आयईडी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि नियंत्रित स्फोटही घडवून आणला होता. आरोपींनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट रचला होता त्या ठिकाणांचा शोध घेतला होता. महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध महानगरांमध्ये गुन्हे करण्याचा आरोपींचा कट होता, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली होती.

दरम्यान, पुणे पोलिसांनी कोंढव्यातील इमारतीची झडती घेतल्यानंतर बॉम्ब तयार करण्याचे साहित्य, जिवंत काडतुसे आणि ‘इसिस’शी संबंधित आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली होती. या गुन्ह्याचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात आला होता. या प्रकरणी ‘एनआयए’ने महम्मद शहानवाझ आलम, रिझवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान, महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (दोघे रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगीर पठाण ऊर्फ अब्दुल कादीर, समीब नसिरुद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), झुल्फिकार अली बडोदवाला ऊर्फ लालाभाई, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघे रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली होती.

या दहशतवाद्यांचं सांगली कनेक्शन समोर आलं होतं. या मोहम्मद इमरान मोहम्मद युनूस खान, मोहम्मद याकूब साकी या 2 दहशतवाद्यांना चोरीच्या प्रकरणात पकडलं होतं. हे दोघेही मोस्ट वॉन्टेड आरोपी होते. त्यांनी थेट सोन्याच्या आणि साडीच्या दुकानात चोरी केली होती आणि चोरलेल्या पैशातून बॉम्ब बनवण्याचं साहित्य विकत घेतलं होतं.

यातील मोहम्मद शहानवाझ आलम या दहशतवाद्यालला कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरत असतांना अटक केली होती. या नंतर पुण्यातील आययसीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. मोहम्मद हा फरार झाला होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या विशह पथकाने त्याला गेल्या वर्षी २ नोव्हेंबर २०२३ ला अटक करत त्याला एनआयएच्या ताब्यात दिले होते. यानंतर याच्या कडून अनेक मोठी माहिती पुढे आली. आरोपीनी सातारा जिल्ह्यातील एका कपड्याच्या दुकानात दरोडा टाकून त्यातून आलेल्या पैशातून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केले.