इंडियाच्या सभेत उद्धव ठाकरेंना भाषा बदलावी लागली; सुधीर मुनगंटीवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने एकत्र येत मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप होत आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषणाची सुरुवात बदलेली पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या याच बदलेल्या कृतीवरून त्यांच्यावर टीका होत आहे.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील या कृतीवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुनगंटीवार म्हणाले, असंगाशी संग केल्यावर आणखी काय होणार? हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो…” अशी हाक देत भाषणाची सुरुवात करायचे. परंतु, उद्धव ठाकरे यांना त्याचा विसर पडलेला दिसतोय. काँग्रेससह इतरांशी संगत केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांची भाषा बदलावी लागली.

ते म्हणाले, भाजपावर टीका करून मतदान घेता येईल, असं विरोधकांना वाटतं. पण, ते सत्तेत असतांना त्यांनी काय केलं? त्यांनी देशाची काय प्रगती केली? यावर ते काहीच बोलत नाहीत. मोदीजी आपल्या भाषणात केलेल्या विकासावर बोलतात. मात्र, विरोधक फक्त टीका करतात. रस्ते, गरीबांसाठी अनेक योजना, शेतकरी हिताचे निर्णय हा मोदींनी केलेला विकास त्यांना त्यांना दिसला नाही. स्वत: केलेल्या घोटाळ्यांचे आरोप विरोधक मोदींच्या नावावर खपवतात, त्यांना अल्झायमर झाला आहे. त्याचं कौतुक करण्यासाठी काय त्यांच्याकडे दिव्यदृष्टी आणि दुरदृष्टी आहे ? खुर्ची एक खुर्ची, खुर्ची दुणे खुर्ची एवढीच त्याची राजकारणाची व्याख्या असल्याची टीका मुनगंटीवारांनी केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील सोशल मीडियावर एक क्लिप शेअर करत पोस्टही लिहीली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे आधीचे भाषण आणि रविवारचे भाषण यांची तुलना करून दाखवण्यात आली. ‘ आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला आज जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार आहेत? बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्ववादी शिवसैनिक आणि स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही.’ अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.