राहुल गांधी यांचं वक्तव्य हास्यास्पद; राहुल गांधी यांच्या विधानावर अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी मुंबईत त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला. यावेळी राहुल गांधी यांनी विरोधकांवर आणि पक्ष सोडून गेलेल्यांना फटकारले. राहुल गांधी यांनी यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांचे नाव न घेता त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी पक्ष सोडल्याचे म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही अशोक चव्हाणांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांचे हे विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझी भावना व्यक्त केली हे वक्तव्य दिशाभूल करणारं असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की मी शेवटपर्यंत काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात काम करत होतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम करत होतो. मी पक्ष सोडेपर्यंत ही माहिती कोणालाही नव्हती ही वास्तव आहे; असं चव्हाण म्हणाले. त्यामुळे राहुल गांधी यांचे विधान माझ्या संदर्भात असेल तर ते चुकीचं आहे. असं अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे नव्हे तर इतर पक्षाचे नेते भीती पोटी भाजप प्रवेश करत असल्याचे चव्हाण यांना विचारले असता इतरांबद्दल मी बोलणार नाही. प्रश्न माझ्याबाबत आहे. पण मी निर्णय घेताना भाजपचे भविष्य आणि भावि्तव्य असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

राहुल यांनी कोणाचंही नाव न घेता भाजपमध्ये गेलेल्या नेत्याचा किस्सा लोकांना सांगितला. ‘महाराष्ट्रातील एक मोठा नेते भाजपमध्ये जाण्याआधी सोनिया गांधी यांना भेटला. तो त्यांच्यासमोर रडला. मला लाज वाटते. मी या शक्तीशी लढू शकत नाही. मला जेलमध्ये जायचं नाही, असं हा नेता म्हणाल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं.