हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले असून, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. राज्यातील महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहभागी व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील दक्षिण मुंबई हा लोकसभा मतदारसंघ मनसेसाठी सोडावा अशी राज ठाकरे यांची मागणी असून, सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सन्मानजनक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात याव्यात यावर देखील या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे.
“राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत. ते कुणाला भेटताहेत? कशासाठी गेले आहेत, या गोष्टी काही तासांत स्पष्ट होतील. पण, एक गोष्ट मी आत्मविश्वासाने सांगेन की राज ठाकरे जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल.”असं संदीप देशपांडे म्हणाले.
शासनानं मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली यापूर्वीच करायला हवी होती बजेट बाहेर जाऊन खर्च केले ते चुकीचे होते. शिवाजी पार्क मैदानात आदित्य ठाकरेंच्या बाल हट्टासाठी दिगावकर यांनी माती टाकली होती, जे चुकीचं होतं ही माती उचलली जावी, याबाबत वॅार्ड ॲाफिसर यांनी आदेश दिले आहेत., असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
बाळा नांदगावकर हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. राज ठाकरेंसोबत ते अनेकवर्षांपासून आहेत. आणि बाळा नांदगावकर जर दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आम्हा महाराष्ट्र सैनिकांना आनंदच होईल, त्यात काही वाईट वाटण्यासारखी गोष्ट नाहीये.
