राजकारणात विरोध असला तरी तुमच्या रक्ताचं नातं आहे; छगन भुजबळांचं श्रीनीवास पवारांना सल्ला

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरोधात भावजाई असा हाय होल्टेज सामना होणार आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजितदादांवर घणाघाती टीका केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आणखी चर्चेत आला आहे.

या टीकेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मार्मिक उत्तर दिले आहे. त्यांनी एका आर्थाने श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे. रक्ताची नाती कधी तुटत नाही, विरोध करा, पण बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवा, असा सल्ला भुजबळ यांनी दिला आहे. अजितदादांचे बरेचसे नातेवाईक त्यांच्या विरोधात गेलेले दिसत आहेत. तुम्हाला अजित दांदाना विरोध करायचे असले तर जरुर करा. पण विरोध करताना भाषेवर नियंत्रण ठेवा. आज राजकारणात तुम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहिला तरी तुमची रक्ताची नाती तुटत नाही. आज ना उद्या तुम्हाला कुटुंब म्हणून एकत्र यावे लागणार आहे. एखाद्या कार्यक्रमास तुम्ही सर्व एकत्र याल. एकमेकांचे तोंड पाहाल. ही रक्ताची नाती तुटत नाही, हे लक्षात ठेवा, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

अगदी अलिकडे कितीतरी भांडण झाल्याचं आपण पाहिलं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे.. पण उद्धव ठाकरेंची काही अडचण निर्माण झाली की राज ठाकरे जातात, आणि राज ठाकरेंकडे काही झालं, तरी उद्धवजी ताबडतोब फोन करतात, काय झालं? विचारतात. रक्ताची ही नाती आहेत, हे लक्षात ठेवूनच भाषेवर थोडंसं नियंत्रण ठेवा असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला.

मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. हलचालींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सर्व पार्श्वभूमीवर दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंना जर बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचितची चर्चा सुरुच आहे. एकदा वरुन जागावाटप ठरलं की बाकी सगळ्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची शक्ती वाढेल. विधानसभेलाही, महापालिकेलाही हे नातं आणि संबंध उपयोगी पडतील. राज ठाकरे येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.