उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला; संतोष बांगरांची उद्धव ठाकरेंवर टीका

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेच हिंगोली दौरा केला. यावेळी त्यांनी शिवेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका केली. पोलिसांच्या धाडी पडल्यावर संतोष बांगर माझ्याकडे यायचा असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला असं म्हणत बांगर यांनी ठाकरेंवर सणसणीत टीका केली आहे. यासोबतच त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व अंबादास दानवे यांच्यावर देखील टीका केली आहे.

पोलिसांच्या धाडी पडल्यावर संतोष बांगर माझ्याकडे यायचा असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर बोलतांना बांगर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली होती, मात्र, तीच शिवसेना संपवण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. त्यांच्या पक्षात असतांना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे. दंगल झाल्यावर अन्याय होऊ नयेत म्हणून संतोष बांगर जायचा आणि त्याला मातोश्रीवर बोलावून प्रशंसा केली जायची. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा सत्यानाश करून टाकला. यामुळे अक्षरशः वेदना होतात,असे बांगर म्हणाले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना देऊन महापाप केलंय, असं विधान देखील संतोष बांगर यांनी केलं. मी त्यांच्या पक्षात असताना संतोष बांगर सारखा ढाण्या वाघ पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणायचे. सर्व जिल्हाप्रमुखांमध्ये नंबर एकचा कोणी जिल्हाप्रमुख असेल तर हिंगोलीचा संतोष बांगर असल्याचे म्हणायचे.

दरम्यान यावेळी बोलतांना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. संतोष बांगर म्हणाले, माकडापाशी काकडा दिला, त्याचे मांडले दुकान, अशी टीका राऊतांवर केली आहे. संजय राऊतांनी पक्षाची राखरांगोळी करून टाकली आहे. उद्धव ठाकरे यांना हे समजत नाही की आपण या मूर्खांसोबत आहोत. त्याचं लोकांच्या नादी लागून ठाकरेंनी पक्षाचा सत्यानाश केला. संजय राऊत आणि अंबादास दानवे लाळचाटे लोकं आहेत, असे म्हणत संजय राऊतांवर संतोष बांगर यांनी टीका केली आहे.