लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांची देखील बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन अधिकारी कोण येणार या कडे लक्ष लागून आहे.भारतीय निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची बदली केली. राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही विनंती फेटाळून लावत अपयश आले. आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई आयुक्तांच्या पदांसाठी प्रत्येकी तीन सनदी अधिकाऱ्यांची ( IAS ) नावे पाठवण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर लगेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यात ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचादेखील यामध्ये समावेश आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्तपदी आता ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली करण्यात आली आहे. मुंबई मनपावर पुन्हा एकदा ठाण्यातील मनपा आयुक्तांची वर्णी लागली आहे.

नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची राज्याचे सहकार आयुक्त म्हणून, तर अनिल कवडे यांची साखर आयुक्त म्हणून मागच्या महिन्यात बदली करण्यात आली होती. दरम्यान अवघ्या एका महिन्यात साखर आयुक्तांची बदली होत आहे. मावळते साखर आयुक्त अनिल कवडे हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली आहे.

कोणाची बदली कुठे?

  1. अमित सैनि, अभियान संचालक, जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.
  2. संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.
  3. राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त, सहकार व निबंधक, सहकारी संस्था पुणे या पदावर.
    4.विशाल नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदावर.
  4. अभिजीत बांगर, आयुक्त, ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका या पदावर.
  5. अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या पदावर.
  6. कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर या पदावर.
  7. अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक , मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन या पदावर.
  8. संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे या पदावर.
  9. शुभम गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर.
  10. पृथ्वीराज बी.पी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा या पदावर.
  11. डॉ. कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त, साखर, पुणे या पदावर.