भारताचे संविधान बदलणे हे कुणालाही शक्य नाही; संविधान अत्यंत मजबूत – चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. भारताचे संविधान बदलणे हे कुणालाही शक्य नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अब की बार 400 पार अशी घोषणा दिली आहे. त्यांना देशाचे संविधान बदलण्यासाठी एवढे प्रचंड बहुमत हवे आहे, पण त्यांना ते मिळणार नाही, अशी टीका शरद पवारांनी इंदापूरच्या शेतकरी मेळाव्यात सोडले होते. पवारांच्या या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून परखड प्रत्युत्तर दिले आहे.

देशाची राज्यघटना अतिशय मजबूत असून ती कोणीही बदलू शकत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांच्यासह नेत्यांच्या खोटेपणाला लोकांनी बळी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या विविध हमीमुळं राज्यघटना बदलण्याच्या भाजपच्या इराद्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही या कळपात सामील होताना पाहणं दुर्दैवी आहे, असं बावनकुळे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे. भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेस मध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले, याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार. उलट मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही. जय संविधान!,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.