संजयकाकांच्या विरोधातील पैलवान निश्चित नाही; सांगली मतदारसंघाबाबत तिढ्यावरून गोपीचंद पडळकरांचा मविआला टोला

सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये चाललेल्या राजकारणावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मविआला टोला लगावला आहे. संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान हे निश्चित झालेले नाही. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे असे पडळकर म्हणाले. तसेच धनगर आरक्षणाचा मुद्द्या टेक्निकल विषय, तो दुरुस्त करू आणि आरक्षणाचा विषय मार्गी लावू, अशी ग्वाही गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. मिरजमध्ये भाजप अल्पसंख्याक कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव फारुख जमादार यांच्याकडून आयोजित इफ्तार पार्टीला पडळकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते बोलत होते.

सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये चाललेल्या राजकारणावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मविआला टोला लगावला आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आत एक, बाहेर एक असे काही नसतं. त्यामुळे भाजपचे उमेदवार खासदार संजय काकांच्या बरोबर आम्ही सगळे जोरात कामाला लागलेला आहोत. मात्र, अजून देखील भाजपचे उमेदवार संजयकाकाच्या विरोधात नेमका कोण पैलवान आहे हे निश्चित होईना, त्यामुळे अजून सगळे लोक संभ्रमात आहेत असे म्हणत सांगली लोकसभेच्या जागेवरुन मविआमध्ये चाललेल्या राजकारणाची आमदार गोपीचंद पडळकर यांनी खिल्ली उडवली आहे.

“धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार धनगर समाजाच्या बाजूने आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाने आता वेगळी भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा टेक्निकल विषय बनला आहे. आरक्षणाबाबतचे सगळे विषय आम्ही दुरुस्त करू आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आम्ही मार्गी लावू,” असा विश्वास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, आरक्षणाच्या बाबतीत आमचं जे म्हणणं होतं ते बसव लिंगाप्पा या केसच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे तो धनगर आहे. परंतु आमच्याच काही लोकांनी धनगराचे दाखले काढल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे, त्याची व्हॅलिडिटी रद्द व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. मात्र त्यात काही अडचणी आहेत. आम्ही या सगळ्या अडचणी सोडवून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू.