अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज राऊज ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीने कोठडी ठोठावली आहे. केजरीवाल आता १५ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहतील. मिळालेल्या माहितीनुसार केजरीवाल यांची तिहार तुरुंगात रवानगी होऊ शकते. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना आज (१ एप्रिल) न्यायालयासमोर हजर केलं. आजच्या सुनावणीवेळी ईडीने न्यायालयाकडे केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

28 मार्च रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांच्या ७ दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने त्यांना 1 एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने आज अरविंद केजरीवाल यांची कोठडी मागितली नाही आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती केली.

एएसजी एस. व्ही. राजू यांनी ईडीची बाजू मांडली. केजरीवाल हे तपासात सहकार्य करत नाहीत आणि सतत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, असं सांगत ईडीनं केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. केजरीवाल यांना तूर्त न्यायालयीन कोठडी सुनावण्यास हरकत नाही, मात्र नंतर ईडीला त्यांच्या आणखी कोठडीची आवश्यकता लागू शकते, असं राजू यांनी खंडपीठापुढं सांगतिलं.

रविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित दोन प्रकरणांची आज (१ एप्रिल) २ वेगवेगळ्या न्यायालयांत सुनावणी झाली. पहिला खटला तुरुंगातून केजरीवाल यांच्या सरकारी आदेशाविरुद्ध होता. तुरुंगातून सरकारी आदेश देण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुरजित सिंह यादव यांनी दाखल केली होती. यावर सुनावणी करताना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.