छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाने केलेल्या एन्काऊंटरमध्ये ९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मध्यप्रदेशातील बालाघाटमध्येही दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलाने आतापर्यंत ११ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.बस्तर रेंजचे पोलीस महासंचालक सुंदरराज पी यांनी या चकमकीची माहिती दिली आहे. ही चकमक साधारण पहाटे ६ वाजल्यापासून सुरू झाली. गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेंड्रा गावाजवळील जंगलात ही चकमक उडाली. सुरक्षा दलाची एक संयुक्त टीम नक्षल विरोधी मोहिमेवर गेले असता ही चकमक उडाली, अशी माहिती सुंदरराज पी यांनी दिली.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. त्यातच सुरक्षा दलानं कठोर कारवाई केली आहे. बस्तरमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नक्षलवाद्यांकडून लोकसभा निवडणुकीत मतदारांसह उमदेवारांना धमकाविण्याचे प्रकार घडत असतात. सुरक्षा दलानं नक्षलवाद्यांवरील केलेल्या कारवायांमुळे नक्षलग्रस्त भागात लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुका शांततेत पार पडण्यास मदत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाची कारवाई ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
गडचिरोलीतील कोरचोली आणि गांगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली आहे. कोरचोलीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. गांगलूर पोलिस हद्दीत अद्यापही चकमक सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. या चकमकीत जंगलातून एलएमजी, एके ४७ अशी स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या तुकड्या अद्यापही जंगलातच नक्षलवाद्यांचा शोध घेत असून पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
छत्तीसगड सीमेवरून नक्षल्यांटा गडचिरोलीत प्रवेश होऊ नये, यासाठी पोलीस सतर्क आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत सी- ६० जवानांनी तळ उध्वस्त करून त्यांचा डाव हाणून पाडला. या भागात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केले आहे.
