महाविकासआघाडीमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ साठीचे जागावाटप जवळपास पूर्ण होत आले आहे. आघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. तेव्हापासून काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम नाराज आहेत. त्यांची ही नाराजी लपून राहिली नाही. इतकेच नव्हे तर त्यांनी मविआतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या ठाकरे गट आणि नेत्यांवर जोरदार टीका करत आहेत. आज एका वृत्तवाहिणीला दिलेल्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचे खापरही त्यांनी राऊत यांच्यावरच फोडले.
ज्याप्रमाणे मुंबईत जोर देऊन सहा पैकी पाच जागा घेण्याचा हट्ट आणि महाराष्ट्रातील ४८ पैकी जास्तीत जास्त जागा घेण्याचा हट्ट त्यांनी केला. त्यांच्याकडे काही नाहीय. त्यांचे नेते पळाले, त्यांचे कार्यकर्ते पळाले. त्यांचे मतदार किती आहेत हे माहीत नाही. तरीही जबरदस्ती करून ते आमच्याकडून जागा घेत आहेत. मी आज भाकित करून जातो की मुंबईमध्ये ठाकरे गट पाचही जागांवर पडणार आहेत. या पाच मतदारसंघातील कार्यकर्ता विखुरणार. वाटाघाटी बरोबरीचं झालं पाहिजे. आमचा प्रस्ताव होता की तीन तीन जागा घ्या. पण पाच जागा तुम्ही घेणार आणि एक आम्हाला देणार. मग आम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार? विदर्भात काँग्रेसची ताकद आहे, पण मुंबईत त्यांची ताकद नाही. ठाकरे गटाची सध्या काय ताकद आहे, हे कोणीही काही सांगू शकत नाही. अशी टीका संजय निरुपम यांनी ठाकरे गटावर केली आहे.
मुंबईपुरतं बोलायचं झालं तर लोकसभेच्या जास्त जागांसाठी काँग्रेसच्या एकाही नेत्याने आग्रह केला नाही. लोकसभा जागावाटपाची सगळ्यात पहिली चर्चा झाली तेव्हा काँग्रेसने मुंबईतील तीन जागा मागितल्या होत्या. यामध्ये दक्षिण मध्य, उत्तर मध्य आणि वायव्य मुंबई मतदारसंघाचा समावेश होता. मात्र, आता आता चर्चेच्या २० फेऱ्या पार पडल्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला फक्त एकच जागा आली आहे. काँग्रेसच्या वाट्याला फक्त उत्तर मध्य मुंबईचा मतदारसंघ आला आहे. याच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान येते. तरीही ही सीट ठाकरे गटाला नकोशी आहे. उद्धव ठाकरे यांना थेट भाजपशी सामना करायची भीती वाटते म्हणून ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे का, असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला.
