“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपरोधिक टोला

वर्ध्यात आज महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उंमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी शरद पवार यांना उपरोधिक टोला लगावला आहे. ते पुढे म्हणाले, ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून काँग्रेसनं इतकी वर्ष राजकारण केलं. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं. म्हणून आपण सगळे त्यांचे मनापासून आभार मानू. आता काय दिवस आले पहा, काँग्रेस तर हद्दपार झालीच आता त्यांना उमेदवार सुद्धा सापडत नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे गांधींजींचं वर्धा ना काँग्रेसचं ना शरद पवारांचं ते मोदींजींचं आणि भाजपाचं यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही, ती शरद पवारांनी करुन दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. जिल्हा परिषद, आमदारकी, नगरपालिका, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. शरद पवारांचे मनापासून आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब करुन दाखवला. शरद पवारांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचं नाव वारंवार सांगून काँग्रेसने इतकं वर्ष राजकारण केलं, त्याच गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करुन दाखवलं. यासाठी मला त्यांचे आभार मानायचे आहेत,असा उपरोधिक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

काय अवस्था झाली आहे बघा, काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार, महायुतीला इथे उमेदवार सापडेना. मग उमेदवाराचा शोध सुरु झाला. मग एक उमेदवार त्यांनी काँग्रेसमधून आयात केला. त्यांना पक्कं माहीत आहे की विधानसभेत निकाल काही बरा लागणार नाही. लोकसभेचं तिकिट घेऊन आपण शहीद व्हावं असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पण काही हरकत नाही सगळ्यांना शुभेच्छा आहेत.

वर्धा भाजपाचं आहे. नरेंद्र मोदींचं आहे. हे आता शिक्कामोर्तब झालं आहे. रामदास तडस यांनी दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेत सातत्याने भूमिका घेतली. सामान्य लोकांमध्ये फिरले. त्यामुळे त्यांना जनतेचं विलक्षण प्रेम मिळालं. रामदास तडस हे पैलवान आहेत. आमच्या पैलवानाने असा डाव टाकला की शरद पवारांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली. “मागील निवडणुकीत रामदास तडस यांना 53 टक्के मतं मिळाली होती. तेव्हा तर मोदी लाट होती. पण यावेळी त्सुनामी आहे. त्यामुळे रामदास तडस यांना 60 टक्के मतं घ्यावीच लागतील. त्यांना लोकांचा आशीर्वाद मिळेलच” अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचे कौतुक केले.