दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य मंडळातर्फे दुष्काळसदृश्य भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना पात्रतेची आवश्यक माहिती, स्वत:च्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा लागणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क प्रतिपूर्ती केली जाणार आहे.

यंदा राज्यात कमी पाऊस पडल्याने राज्यभरातील ४० तालुक्यांसह १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, शुल्क प्रतिपूर्ती करण्याची योजना आहे. त्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याबात राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना, तसेच त्यासंदर्भातील कार्यवाहीबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत.

शासन आदेशानुसार राज्यातील दुष्काळग्रस्त बाधित क्षेत्रातील इयत्ता दहावी, बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून ऑनलाईन आधार संलग्न बँक खात्याची माहिती तातडीने मागण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याच्या हलचालींना वेग आला आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफी, शुल्क प्रतिपूर्तीसाठी ३२ कोटी ७ लाख ९७ हजार ४७५ रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून सादर करण्यात आला होता. त्यात बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १५ कोटी ८८ लाख २४ हजार ९२५ रुपये, तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ कोटी १९ लाख ६२ हजार ५५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.