लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. काँग्रेस नेते आणि प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी पक्षाच्या सर्व पदांवरुन राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण देखील सांगितले. सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. तसेच देशाची संपत्ती निर्माण करण्यांविरोध बोलू शकत नाही त्यामुळे राजीनामा देत असल्याचे गौरव वल्लभ यांनी स्पष्ट केले.
गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आज काँग्रेस पक्ष ज्या दिशाहीन मार्गाने पुढे जात आहे, तो मला तरी योग्य वाटत नाही. मी सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही किंवा सकाळ-संध्याकाळ देशाच्या वेल्थ क्रिएटर्सना शिवीगाळ करू शकत नाही. या कारणास्तव मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.
‘मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. पक्षाने मला राष्ट्रीय प्रवक्ता बनवले तेव्हा मी माझे मत ठामपणे मांडले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेमुळे मी अस्वस्थ होतो. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा मला वाटले की हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. येथे तरुण, बुद्धिजीवी लोकांच्या विचारांना महत्त्व दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षात माझ्या लक्षात आले की पक्षाचे सध्याचे स्वरूप तरुणांना नव्या कल्पनांसह सामावून घेण्यास सक्षम नाही. पक्षाचा ग्राऊंड लेव्हल वर संपर्क तुटला आहे. नव्या भारताच्या अपेक्षा तुम्ही समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे ना पक्ष सत्तेत येऊ शकला आहे ना विरोधी भूमिका ठामपणे पार पाडत आहे. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निराश करत असल्याचे गौरव वल्लभ यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना गौरव वल्लभ यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “काँग्रेस पक्षाची वाटचाल सध्या काँग्रेसच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात सुरू आहे. थोडक्यात ती चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे. एकीकडं आपण जातनिहाय जनगणनेबद्दल बोलतो आणि दुसरीकडं संपूर्ण हिंदू समाजाचा पक्षाला विरोध होताना दिसत आहे. या कार्यशैलीमुळे समाजाला दिशाभूल करणारा संदेश मिळत आहे. काँग्रेस पक्ष एका विशिष्ट धर्माचा समर्थक आहे, हे काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे,” असं गौरव वल्लभ यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केलं आहे.
काँग्रसने रामल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून स्वत:ला दुर ठेवले, यावर देखील गौरव वल्लभ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक आहे. पक्षाच्या या भूमिकेने मला अस्वस्थ केले. पक्ष आणि आघाडीशी संबंधित अनेक लोक सनातनच्या विरोधात बोलतात आणि त्यावर पक्ष गप्प बसतो. एक प्रकारे, मौन संमती देण्यासारखे आहे.
