हरियाणातील भिवानी येथे राहणारे ऑलिम्पियन बॉक्सर विजेंदर सिंग बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला ‘ठोसा’ दिला आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात त्याने पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. विजेंदरने २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना दक्षिण दिल्लीतून लोकसभेचे उमेदवार केले होते, मात्र त्यांचा निवडणुकीत पराभवझाला.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या काही दिवस अगोदरच विजेंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विजेंदर सिंग यांचा निर्णय आश्चर्यकारक आहे, कारण ते सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आले आहेत. शेतकरी आंदोलन असो किंवा कुस्तीपटूंचे आंदोलन, या सर्व प्रकरणात त्यांची भाजपाविरोधी भूमिका राहिली आहे. विजेंद्र यांची राजकीय कारकीर्द फारच लहान राहिली आहे. 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून, त्याने दक्षिण दिल्लीच्या जागेवरून निवडणूक लढवली होती. परंतु रमेश विधुरी यांच्या विरोधात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर राजकारणातील सक्रियता कमी झाली आणि डिसेंबर २०२३ मध्ये त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित राजकारणाला राम-राम केला होता. पण आता विजेंद्र सिंगने राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विजेंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील काही दिवसांपासून विजेंदर सिंग यांना मथुरेतून भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांच्याविरोधात काँग्रेसकडून तिकीट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यावर त्यांनी एक्स हँडलवर ‘जनतेला जिथून हवे, मी तयार आहे,’ असे म्हटलं होतं. विजेंदर सिंगने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. काही काळापूर्वी विजेंदरनेही आम आदमी पक्षात प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली होती.
विजेंदर सिंग हरियाणातील एक जाट चेहरा आहे. भाजपाला आशा आहे की, त्यांच्या प्रवेशाने जाट समुदायाची मते भाजपाच्या खात्यात पडतील. विजेंदर सिंग हरियाणातील भिवानी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. २०२२ मध्ये त्यांनी भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अद्याप तरी भाजपा त्यांना उमेदवारी देणार की नाही, यावर कोणतीही चर्चा नाही.
