जात पडताळणीत प्रकरणी अपात्र ठरलेल्या काँग्रेसच्या रामटेकच्या लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्दच ठेवण्यात आली आहे. रश्मी बर्वेंच्या जात पडताळणीत प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नाही. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे, मात्र उमेदवारी अर्ज रद्दच ठेवण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने निकालाला स्थगिती दिली आहे.
रश्मी बर्वे यांना जात व जातवैधता प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी दिलासा मिळाला असला तरी त्यांची उमेदवारी खारिज केल्याप्रकरणी दिलासा मिळाला नसल्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली आहे. राज्यात पाच टप्प्यांत मतदान होत असून, पहिल्या टप्प्यात रामटेक लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. म्हणजे येत्या 19 एप्रिलला येथे मतदान होईल, तर बर्वेंचा अर्ज खारिज केल्याच्या प्रकरणाबाबतची पुढील सुनावणी 22 एप्रिलला होणार आहे.
याचिकेनुसार, रश्मी बर्वे यांच्या जातप्रमाणपत्राचा एक मुद्दा अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाली काढला. मात्र, गेल्या आठवड्यात राज्य सरकारने नव्याने त्यांच्या चौकशीचे आदेश जारी केले. तसेच गेल्या आठवड्यात जिल्हा जातपडताळणी समितीनेसुद्धा बर्वे यांना नोटीस बजावली. समितीने तर त्यांना अवघ्या 24 तासांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. हे नैसर्गिक न्याय नियमांच्या विरुद्ध आहे. इतकेच नाही तर अगदी तातडीने समितीने त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरविले.
केवळ राजकीय फायद्यासाठी विविध पक्षांकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप रश्मी बर्वे यांनी याचिकेत केला होता. रामटेकच्या उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांच्या एबी फॉर्मवर काँग्रेसनेही डमी उमेदवार म्हणून त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचे नाव लिहिले होते. जात प्रमाणपत्रावरील आक्षेपामुळे रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेल्यास रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे हे पर्यायी उमेदवार म्हणून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील.
