‘अलिबाग’चं नाव बदला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उस्मानाबाद, औरंगाबाद, या शहरांपाठोपाठ आता अलिबाग शहराचे नाव बदलावे अशी मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. अलिबाग शहरासह तालुक्याचे नामकरण करण्यात यावे असे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. अलिबागचे नाव बदलून ‘मायनाक नगरी’ ठेवावे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारावे अशी मागणीदेखील या पत्रातून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सह सचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत ही मागणी केली होती. या शिष्ठमंडळाच्या मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. त्यानुसार, ही मागणी अतिशय रास्त असून त्याची शासन स्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना अतिशय महत्त्व आहे. महाराजांनी दूरदृष्टीने बलाढ्य आरमाराची उभारणी केली. कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे त्यांनी समुद्रमार्गे स्वराज्याला धोका उद्भवल्यास सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांनादेखील माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे ‘मायनाक नगरी’हे नामकरण करावे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सदरची मागणी अतिशय रास्त असून त्याची शासन स्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. दरम्यान या मागणीला अलिबाग मधूनच विरोध होऊ लागला आहे. कान्होजी राजे आंग्रे यांच्या वंशजांनी यावर आक्षेप घेतला आहे.