सुप्रीम कोर्टाकडून भाजप नेत्या नवनीत राणांना मोठा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अमरावती येथील भाजप नेत्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत बहुचर्चित असलेला निकाल गुरुवारी आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्‍या. त्यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍याशी २०११ मध्‍ये विवाह केला होता. विवाहानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. अशात नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र २०२१ मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बनावट जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश माहेश्र्वरी आणि न्यायाधीश संजय करोल यांच्या खंडपीठापुढं सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता, तर आता लोकसभा निवडणुकीअगोदर नवनीत राणा प्रकरणाचा निकाल लागला आहे. जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप अडसूळ यांनी केला होता. हे प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाने आज योग्य असल्याचा निकाल दिला आहे.

नवनीत राणा आज अमरावती लोकसभेसाठी भाजपाकडून अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरणार आहेत. त्यांनी आज सकाळी अर्ज भरण्यापूर्वी देवदर्शन केले होते. अमरावतीत हनुमान गढी वर देखील दर्शन घेतले होते. कोर्टाने त्यांचा अर्ज दाखल होण्यापूर्वी निर्णय देत त्यांना मोठा दिलासा आहे. त्यामुळे आता त्या आरक्षित जागेवरून निवडणूक लढवू शकणार आहेत.