लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का; माजी मंत्री करणार शिवसेनेत प्रवेश जाणार

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मागील वर्षभरात ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे.

नाशिकमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप हे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे. तर ठाकरे गटात आपल्यावर अन्याय झाला असून राजीनामा देऊन दोन महीने झाले तरी आपल्याशी कोणी संपर्क साधला नाही, त्यामुळे मी शिवसेनेत जात असल्याचं घोलप यांनी सांगितलं आहे.

नाशिकरोड देवळाली मतदार संघात तब्बल पाच वेळा आमदारकी भूषवणाऱ्या बबनराव घोलप यांना राज्यात युतीची सत्ता असताना समाज कल्याण मंत्री पद देण्यात आले होते त्यानंतर त्यांचे पुत्र योगेश घोलप हे या मतदारसंघात आमदार होते दरम्यान घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिर्डीचे संपर्क मंत्री पदही दिले होते. मात्र, मध्यंतरी भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आणि त्यामुळेच आपली उमेदवारी धोक्यात आल्याचे कळल्यावर घोलप यांनी आधी उपनेते पदाचा आणि नंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

माजी मंत्री राहिलेले बबनराव घोलप उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहे. परंतु त्यांचे पुत्र योगेश घोलप यांची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार की उद्धव ठाकरे बरोबर राहणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घोलप यांच्यासोबत आणखी काही पदाधिकारी शिवसेनेत जाणार असल्याची शक्यता आहे.