हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. काही भागात अवकाळी पाऊस झालाय. तर काही भागात गापटीनं तडाखा दिलाय. विशेषत: विदर्भाच्या काही भागात अवकाळी झालाय. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसलाय. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. वरुड तालुक्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यासह अनेक भागात पुन्हा गारपीटीसह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे संत्रा,कांदा, गहू पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामूळे चांदुर बाजार तालुक्यातील जमापूर आणि शिरजगाव बंड गावात घरांची मोठी पडझड झाली.
वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. १०) विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. मराठवाड्यात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवस काही बदल होणार नाही. त्यानंतर पुढील तीन दिवस तापमानात हळूहळू घट होईल. यामुळे उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
