सांगलीबाबत लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा; वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली – विश्वजित कदम

सांगलीबाबत लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा असे विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे. सांगलीमध्ये महाविकास आघाडीतील तिढा वाढण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता ते काँग्रेसकडूनही अर्ज भारण्यावर ठाम आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विश्वजित कदम म्हणाले की, सांगली लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात चर्चेत राहिला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल मला तातडीने बोलावलं होतं. त्यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि इतर सर्वांची पटोले आणि थोरात यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याशीही माझं बोलणं झालं. या चर्चेत मी सांगलीमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, ती त्यांच्यासमोर मांडली. तसेच या संदर्भात लवकरात लवकर एक संयुक्त मार्ग काढावा ज्यामुळे राज्यातील आणि सांगलीतील महाविकास आघाडीसंदर्भात एक ठोस पाऊल उचलता येईल, असे मी त्यांना सांगितले.

दरम्यान काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी देखील सांगलीमधून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावर देखील विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही, मात्र शेवटच्या क्षणालाही एबी फॉर्म जोडला जाऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले आहेत, एक काँग्रेस पक्षाचा आणि एक अपक्ष म्हणून असं कदम यांनी म्हटलं आहे. कदम यांच्या या वक्तव्यामुळे आता सांगलीमधून महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘राज्याच्या आणि देशाच्या ज्येष्ठ नेत्यांची जबाबदारी आहे. सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून आम्ही सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहे. सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसला मिळावी, त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण सांगलीची परिस्थिती सध्या उद्भभवली, त्याला सगळे आपण साक्षीदार आहोत, असेही विश्वजित कदम यांनी सांगितले.