राज्यात उष्णतेची लाट, शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा; राज ठाकरेंची सरकारला विनंती

गेल्या काही दिवसांपासून देशभरात उन्हाचा कडाका कमालीचा वाढला आहे. महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आली असून, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशांच्या वर जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून राज्य सरकारसह राज्यातील जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी.

माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वत:ची काळजी घ्या. तसेच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा.असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज्यात आज उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, रायगड, ठाणे या भागातील तापमान 36 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर फिरणं टाळण्याचं आवाहनही हवामान खात्याने केलं आहे.