रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून महायुतीत असलेला तिढा अखेर सुटला आहे. महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा भाजपच्या पारड्यात पडली असून भाजपने या जागेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर होण्याआधी या जागेवरून इच्छुक असणारे किरण सामंत यांचे बंधू मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी उदय सामंत यांनी उमेदवारीवरून असलेला तिढा सुटल्याचं सांगत राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यास आम्ही पाठिंबा देऊ असं म्हणत भूमिका स्पष्ट केली.

नारायण राणे उद्या शक्ती प्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात थेट लढत असणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार राणे की सामंत यावरून मागील काही दिवस चर्चा सुरु होती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपकडून नारायण राणे इच्छुक आहेत. मात्र, मोदी-शाहांनी नारायण राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवायचे ठरवले आहे. नारायण राणेंनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सभांचा धडाका लावला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वरवडे गावचे सुपुत्र असलेले नारायण राणे हे सरकारी नोकरी सोडून १९७५ ते ८० च्या दरम्यान शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर १९८५ साली नगरसेवक म्हणून समितीच्या मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधून बाळासाहेबांनी त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आणि कणकवली या विधानसभा मतदारसंघातून १९९० साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९० पासून २००५ आणि २००९ साली त्यांनी कुडाळ मतदारसंघातून विजय मिळविला.

रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात २०१९ मध्ये विनायक राऊत आणि नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली होती. राऊत यांनी शिवसेना -भाजप युतीकडून लढविली होती तर राणे यांनी स्वाभिमान पक्षातून उभे होते. या लढतीत राऊत यांनी बाजी मारली होती.