राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आज महायुतीचे अनेक उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत. दरम्यान आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून आज पुण्यात मोठं शक्ती प्रदर्शन केले जात आहे. महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सुद्धा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भावनिकतेला बळी पडू नका, असे आवाहन करत अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर तोफ डागली. काही लोक आपल्याकडे येतील किंवा आपल्याला फोन करतील. काही भावनिक होऊन आपली बाजू मांडलीत. मात्र, यातील काही महत्चाचं नसून आपल्याला आपला देश कुणाच्या हातात द्यायचा आहे हे आता ठरवायच आहे. ही निवडणूक इथं कोण कुणाच्या विरोधात आहे अशी नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरूद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी अशी आहे. त्यामुळे कोणत्याही आश्वासनाला आपण बळी पडू नका, असं म्हणत आपल्याला साथ द्या अशी विनंती अजित पवार यांनी यावेळी उपस्थितांनी केली.
ही निवडणूक मोदींविरुद्ध राहुल गांधी अशी आहे. उगाच भावकीची निवडणूक केली जाते आहे. ही निवडणूक देश पातळीवरची आहे. अजिबात हलक्या कानाचे राहू नका, बनवाबनवी सुरू आहे, ऐकू नका” असा कानमंत्रही अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
मित्र कसा असावा आणि विरोध कसा असावा याचे उदाहरण विजय शिवतारे असल्याचेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले. अजित पवार यांनी सांगितले की ही निवडणूक गावकी आणि भावकीची नाही, तर देशाची निवडणूक आहे. त्यामुळे देश नेमका कोणाच्या हातात द्यायचा याचा विचार करावा लागणार आहे. आज फक्त सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे यांचा नंतर अर्ज भरला जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केली होती. पण नंतर त्यांनी माघार घेत सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सुरू केला. सासवडमध्ये त्यांनी त्यासाठी सभाही घेतली. त्यानंतर आज कोंडे यांना पक्षात आणत त्यांनी दादांना मोठा दिलासा दिला आहे. कोंडे यांनी भोर विधानसभा मतदारसंघात दोनदा निवडणूक लढली आहे. त्यांना मिळालेली मतेही लक्षणीय होती.
