लोकसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपात महाविकास आघाडीला अटी आणि शर्थींनी हैराण करून सोडलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला विधानसभेत आघाडी करण्यासाठी दोनदा साद घातली होती. आता ही साद ताजी असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचा न्यायाशी संबंध नसल्याची टीका ट्विट करून केली आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीत न्याय पत्रावरून प्रचार करत असतानाच प्रकाश आंबडेकर यांनी रोहित वेमुला प्रकरणावरून टीका केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर ‘काँग्रेसचा न्यायाशी काहीही संबंध नाही’ अश्या आशयाचा फोटो पोस्ट केला. त्याचबरोबर ते म्हणाले, “तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणाच्या तपासाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये, रोहित वेमुला हा दलित नव्हता, असे म्हंटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या अखत्यारीत तेलंगणा पोलीस येतात.” रोहित वेमुलासाठी काँग्रेसचा वेगळा न्याय असल्याचे सांगून त्यांनी रेकॉर्ड्समधील पुढील मुद्दे मांडले. आपली “खरी जातीय ओळख” शोधून काढेल या भीतीने रोहितने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येसाठी दबाव टाकण्यात आलेले कोणतेही तथ्य किंवा परिस्थिती रेकॉर्डवर उपलब्ध नाही. त्याच्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. तपास अधिकाऱ्यांनी रोहीतची आई राधिका वेमुला यांना विचारले की त्या त्यांची जात निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यास इच्छुक आहेत का?
तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी राहुल गांधी आणि रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांचा ‘भारत जोडो यात्रा’ दरम्यानचा गळाभेटीचा फोटो पोस्ट करत म्हंटले, “हे दलित, आदिवासी, मुस्लिम वरील प्रेम सर्व खोटं आहे. त्यांना फक्त आपली मते हवी आहेत अजून काही नाही. आता सांगा काँग्रेस भाजप-आरएसएस पेक्षा कसे वेगळे आहे?”
तत्पूर्वी, लातूरमधील जाहीर सभेत प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्यांदा काँग्रेसला आघाडी करण्यासाठी साद घातली होती. आंबेडकर म्हणाले होते की, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. सध्या काँग्रेसमध्ये जे होत आहे ते काही बरोबर नाही अशी त्यांची धारणा आहे. विधानसभेत काँग्रेसवाले जर तयार असतील, तर एकत्र आम्ही विधानसभा लढू. मात्र, आत्ताच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काँग्रेसचे सँडविच होत आहे. काँग्रेस पक्षाला जर सँडविच व्हायचं नसेल तर ते आमचे ऑफर नक्कीच स्वीकारतील, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
