आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांनी बारामती मतदारसंघामध्ये आपआपला उमेदवार जिंकून येण्यासाठी संपूर्ण जोर लावल्याचं चित्र दिसत आहे. बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत असून त्यामध्ये बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. बारामतीमधील मतदानाच्या आदल्या रात्री मतदारसंघात पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी विरोधकांचा उल्लेख करत केला आहे. मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत आता राष्ट्रवादीने रोहित पवारांच्या अटकेची मागणी केली आहे.

आमदार रोहित पवार यांना तातडीने अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. अजून किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत, याची चौकशी निवडणूक आयोग व गृह खात्याने करावी, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप केले, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. “बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस… यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय”, अशी पोस्ट रोहित पवारांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली आहे.

“रोहित पवारांकडून बारामती मतदारसंघामध्ये रडीचा डाव सुरु झाला आहे. आपलीच लोक, स्वत:ची माणसं घड्याळ चिन्हाचं लेबल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी फिरवत आहेत. त्यांच्या हातात पैशाच्या बॅगा देत आहेत. या माध्यमातून समाजामध्ये वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम कट कारस्थानाअंतर्गत रोहित पवार करत आहेत,” असं चव्हाण म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “रोहित पवारांनी हा रडीचा डाव थांबवावा. माझी निवडणूक आयोगाला आणि ग़ृहखात्याला विनंती आहे की रोहित पवारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील फोनमधील सखोल चौकशी करावी. त्यांनी अजून किती लोकांना बारामती मतदारसंघाचं वातावरण गढूळ करण्यासाठी सोय केली आहे याची पोलिसांनी चौकशी करावी,” अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.