सूर्य आग ओकत असल्याने सोलापूर आणि ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली त्रासदायक ठरत आहे. आज (ता.८) मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह, विदर्भात गारपिटीसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूरमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर धाराशिवमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासोबतच विदर्भात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात बहुतांश जिल्ह्यात आज पासून ११ मे पर्यंत मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोडी, गोंदिया, अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये आज व ८ मे रोजी गारांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भात सुद्धा यलो यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
देशातील १० मे पर्यंत पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्पात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर ईशान्य आसाम व बिहार राज्यामध्ये चक्राकार वाऱ्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. पूर्वेकडील आणि द्विपकल्प भागात वाढलेली उष्णता पुढील काही दिवसांत हळूहळू कमी होईल.
