मान्सूनच्या आगमानसासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच हा अखेरचा टप्पा अनेकांसाठीच अडचणींचा ठरत आहे. कारण, बहुतांश भागांमध्ये उकाडा वाढतच चालल्यामुळं हा दाह अनेकांना सोसेनासा झाला आहे. एकिकडे उकाडा अडचणी वाढवत असतानाच दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व पावसानंही धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यांसह येणाऱ्या या पावसामुळंही नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे. तर, शेत आणि फळबागांचंही नुकसान होत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल असं सांगत इथं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात येत्या काळात तापमानातीच चढ-उतारही पाहायला मिळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुणे, नगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर, सांगली, नांदेड, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात आज आणि उद्या या दोन दिवसांत तुफान पाऊस होईल असा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील वर्षी देशात 8 जून रोजी मान्सूनची एंट्री झाली होती. मात्र यावर्षी दक्षिण अंदमानच्या समुद्रात 19 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे यंदा मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे.
नागपूरसह विदर्भात पुन्हा दोन दिवसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भात रविवारपर्यंत अवकाळी पावसाचे सावट आहे. मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला तरी विदर्भात उन्हाळ्याच्या तीव्रतेऐवजी सातत्याने वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस बरसत आहे .
