मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या जामीनावर बाहेर आहेत. ईडीने अटक केल्यानंतर त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना आता मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. स्वाती मालीवाल प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. स्वाती मालीवाल १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. तिथे बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप स्वाती यांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांचे एक पथक आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि बिभव कुमारला तेथून ताब्यात घेण्यात आले. मालिवाल यांनी आरोप केला आहे की, जेव्हा ती मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी गेली तेव्हा बिभवने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्याविरोधात काउंटर केस दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत बिभवने स्वाती मालीवाल यांच्यावरही अनेक आरोप केले आहेत.
अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याप्रकरणी मालिवाल यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात जबरदस्तीने प्रवेश केला आणि त्यांना थांबवल्यावर गोंधळ घातला आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर स्वाती यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ‘आप’ने हे भाजपचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ड्रॉइंग रुममधला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्व प्रकार समोर आलाय. स्वाती मालीवाल असं बोलताना ऐकू येतं की हात लावून तर बघ, तुझी नोकरी घालवेन. व्हिडीओमध्ये सुरक्षारक्षक दिसतो. स्वाती मालीवाल यांच्याशी संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनीही मोठी माहिती दिलीय. दिल्ली पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासली जाईल असं म्हटलं.
