भगवा आमचा स्वाभिमान, उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसेच शरद पवारांची राजकीय वेळ संपली असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा सुपुत्र इतक्या खालच्या स्तराला जाईल असं कधीही आणि कोणालाही वाटलं नव्हतं, असं म्हणत धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे.
याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर एकदम कडू शब्दात टीका केली आहे. आता भगवा आमचा स्वाभिमान आहे. ठाकरे यांचा आता भगव्याशी कसलाही संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध आतां फक्त हिरव्याशी आहे, याचा पश्चाताप उद्धव ठाकरेंना आयुष्यभर नक्कीच होणार असल्याचं गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.
“देशात आणि राज्यात जे लोकं मोदींना विरोध करत आहेत. त्यांचा अवाका किती आहे? त्यांना खूप मर्यादा आहेत. ज्या पद्धतीनं डबक्यातले बेडूक डराव डराव करतात, त्याच पद्धतीनं ही लोकं महाराष्ट्रात बोलत आहेत. मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे. यांना प्रचंड मर्यादा आहेत. यांच्या नादाला लागून काही उपयोग नाही. चार जूननंतर यांची तोंडं काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत.”, असंही वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
