उजनी धरण पात्रात मृत्यूचे तांडव; बोट उलटून 6 जणांना जलसमाधी

उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. यामधील सहा प्रवास करणारे धरणात बुडाले आहेत. त्यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. धरणात बुडालेल्या सहा जणांचा शोध घेण्याकरिता रात्रभर शोधकार्य सुरू राहिले. सलग दुसऱ्या दिवशी आज शोधकार्य सुरू आहे. बोटीत राहुल डोंगरे हे पोलीस उपनिरीक्षक होते. त्यांनी बोट उलटल्यानंतर धाडसाने पोहत धरणाचा काठ गाठून जीव वाचवला. बोटमधील वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्यानं ग्रामस्थांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान धरण पात्रात जिथे बोट बुडाली त्याठिकाणी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोटीने दाखल झाले आहेत. एनडीआरएफ च्या बोट मध्ये बसून ते घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी 35 फूट पाण्याखाली एका खडकावर अडकली आहे. त्याठिकाणी चप्पल, पर्स, हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या आहेत. लवकरच पाणबुडीच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसेस विजय दशरथ शिवतारे वारजे माळवाडी टीम दाखल झाली आहे. बनारसी चौहान ही व्यक्ती आता तळाशी शोध घेणार आहे. करमाळा आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडली आहे.

काल (21 मे) सायंकाळी डोंगरे व जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते. हे सर्व प्रवासी कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणाऱ्या बोटेत होते. बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस आणि जोरदार वारा सुटला. त्यामुळं रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले आणि बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्यानं दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले. त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला. हा जीवन मरण्याचा संघर्ष जवळपास 10 ते 15 मिनिटे सुरु होता. मात्र, जोराच्या वादळामुळं त्यांची झूंज अपयशी ठरली. अखेर पाणी शिरलेली बोट पात्रात बुडाली.

या दुर्घटनेमुळे उजनी जलाशयातील जलवाहतुकीच्या नियमांचा उडालेला बोजवारा आणि प्रशासनाचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. जलवाहतूक करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हवा भरलेली रबरी ट्यूब, विशिष्ट पद्धतीचे जॅकेट यासारखी आवश्यक असलेली साधने उपलब्ध नसतात.