खासदार गजानन किर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करावी; शिवसेना उपनेत्याची पत्राद्वारे मागणी

लोकसभा निवडणूक 2024 साठी मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान झाले. मराठी टक्का, गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेऊन महायुती आणि महाआघाडीत जोरदार चुरस दिसली. पण आता शिंदे गटातील खदखद पण बाहेर आली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन आलेले खासदार गजानन किर्तीकर यांची शिंदे गटातून लागलीच हकालपट्टी करण्याची मागणी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून किर्तीकरांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी वक्तव्यं केल्याप्रकरणी त्वरीत शिवसेनेतून हकालपट्टी करावी आणि त्यांना ताबडतोब निरोपाचा नारळ द्यावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात एक पत्र शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलं आहे.

शिशिर शिंदे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय की, लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्ष विरोधी वक्तव्यं केली. दोघांनीही विरोधी पक्ष ठाकरे गटाचे बाजू घेतली. त्यामुळे मातोश्रीचे “लाचार श्री” होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

गजानन किर्तीकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनतर अमोल किर्तीकर हे गजानन किर्तीकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच गजानन किर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल किर्तीकर यांनी स्वत: च्या प्रचारासाठी विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्याचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र फायदा ठाकरे गटाला झाला असा आरोपही शिशिर शिंदे यांनी केलाय.