लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार गुरूवारी सायंकाळी समाप्त झाला. आता त्या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 जागांसाठी उद्या (शनिवार 25 मे) मतदान होईल.दिल्ली आणि हरियाणातील सर्व जागांचा त्यामध्ये समावेश आहे.
या टप्प्यातील मतदानासाठी 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 1978 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. सर्व 07 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी (जम्मू आणि काश्मीरमधील 3-अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील स्थगित मतदान वगळता) 6 व्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 06 मे 2024 होती. दाखल केलेल्या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर, 900 उमेदवारी अर्ज वैध आढळून आले. 3-अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात एकूण 28 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते आणि त्यापैकी 21 उमेदवारी अर्ज वैध असल्याचे आढळले.
सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 470 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते, त्याखालोखाल हरियाणामध्ये 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये 370 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. झारखंडमधील 8-रांची लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 70 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्या खालोखाल देशाची राजधानी दिल्ली मधील 2-ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात 69 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. सहाव्या टप्प्यासाठी सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची सरासरी संख्या 15 आहे.
ओडिशात विधानसभेसाठी मतदान
ओडिशामध्ये शनिवारी लोकसभा निवडणुकांबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे़ विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत ४२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.
