अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांचं चित्रपटांमध्ये जितकं योगदान आहे तितकंच योगदान हे मराठी नाट्यसृष्टीला पुढे नेण्यामध्ये आहे. सोबतच ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या गेली कित्येक वर्ष नाट्यसृष्टीची अविरत सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत आता या दोन्ही कलाकारांना यावर्षीचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. १४ जून २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नाट्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी केला जातो. यानिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत दामले यांनी केले आहे.

दरम्यान, यंदा कोणा कोणाला वरीव पुरस्कार मिळणार आहेत

लीला मेहता पुरस्कृत भार्गवराम पांगे कार्यकर्ता पुरस्कार : गणेश तळेकर (नाट्य चळवळीसाठी विनामूल्य कार्याबद्दल)
डॉ. न. अ. बरवे स्मृती पुरस्कार – प्रशांत जोशी
कमलाकर वैशंपायन स्मृती पुरस्कार – दीपाली घोंगे
कै. भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार – शशांक लिमये (उत्कृष्ट निवेदक)
बाळकृष्ण भोसले स्मृती पुरस्कार – विजय जगपात (गुणी रंगमंच कामगार)
वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षा पुरस्कार – संजय देवधर (समीक्षा)
अ. सी. केळुस्कर स्मृती पुरस्कार – गोविंद गोडबोले (बालरंगभूमीवरील योगदान)
कै. विनय आपटे, कै. अविनाश फणसेकर आणि कै. भाई बोरकर स्मृती पुरस्कार – प्रायोगिक नाट्यसंस्था- अभिनय संस्था (कल्याण) – अभिजीत झुंझारराव
सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक : प्रणीत बोडके
नाट्य मंदार पुरस्कार : अशोक ढेरे
उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार : अशोक बेंडखळे
कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार : श्याम आस्करकर
विशेष पुरस्कार : स्व: रितेश सांळुके (कार्यकर्ता पुरस्कार)
लोककलावंत पुरस्कार : सुनील बेंडखळे