उन्हाच्या चटक्यासह मराठवाडापाणीटंचाईच्या झळांनी हैराण झाला आहे. मराठवाड्यातील एकूण ९२० लघू, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आता केवळ ९.६३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षी हाच साठा ३९.३३ टक्के एवढा होता.जलसंपदा विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मराठवाडा विभागात आज ६९९.३० दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात आता ५.६५ टक्के पाणीसाठा उरला आहे.
राज्यात मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे बहुतेक धरणे शंभर टक्के भरलीच नाहीत. त्यामुळे पावसाळ्यातही राज्याच्या काही भागात टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता हे संकट अधिकच गडद झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागले आहेत. जनावरांच्या चा-याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
आचारसंहितेत सुट मिळण्याची सरकारची मागणी
दुष्काळाबाबत विविध उपाययोजना करणे तसेच याबाबत सध्या सुरू असल्या वेगवेगळ्या योजनाही पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आचारसंहिता शिथिल होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी सरकारने केली आहे. देशात सात टप्पे असून सातव्या टप्प्याचे मतदान १ जूनला आहे. तर चार जूनला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत देशात आचारसंहिता लागू असणार आहे. या कारणाने महाराष्ट्रात सरकारला दुष्काळासंबंधी उपाययोजना करण्यात अडचणी येत आहेत.
सध्या संपूर्ण देशात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मान्सून बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांचा आणखी काही भाग व्यापणार आहे. त्याचबरोबर केरळच्या दक्षिण भागात चक्रिय वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे लगतच्या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
