शांतीगिरी महाराज करणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. यामुळे राज्यातील सर्व उमेदवार आता निकालाची वाट पाहत आहे. परंतु नाशिकमधील महायुती विरोधात लढणारे उमेदवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी वाराणसीमध्ये जाणार आहेत. वाराणसी लोकसभा मतदार संघात १ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून शांतीगिरी महाराज यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. ते आता नरेंद्र मोदी यांचा काशीत जाऊन प्रचार करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी अपक्ष लढवली. त्यानंतर शांतीगिरी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी शनिवारी वाराणसीला रवाना होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले राजकारणातले आदर्श आहेत. आपण त्यांच्यासाठी प्रचाराला वाराणसीला जाणार असल्याचे स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचचा आपला स्वतःचा निर्णय होतो. परंतु देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवणे गरजेचे आहे. यामुळे आपण काशीत जाऊन त्यांचा प्रचार करणार असल्याचे शांतिगिरी महाराज यांनी म्हटले आहे. भाजपामध्ये जायचे की नाही? हे लोकसभेच्या निकालानंतर ठरवू, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी आपण निवडणूक लढविल्याचा शांतिगिरी महाराजांनी नारा दिला होता. आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी नाशिकच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. पुण्यातील अपघात घटनेच्या पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराज हे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेणार आहेत.