विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, 26 जूनला मतदान

लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील 5 टप्पे संपल्यानंतर आता आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झालीय. 26 जूनला 4 जागांसाठी मतदान होणार आहे तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे..

आधी या ठिकाणी 10 जून रोजी मतदान होणार, ही तारीख जाहीर करण्यात आली होती. दरम्यान काही दिवसांपुर्वीच या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे करण्यात आली होती. दरम्यान आता निवडणूक आयोगाकडून अपडेट वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे .

विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 31 मे ते 7 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. यानंतर 10 जून रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी होईल आणि 12 जूनपर्यंत उमेदवारांना त्यांचा अर्ज मागे घेता येईल. यानंतर 26 जून रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.