पुण्यातील घटनेचे राजकारण करणे अयोग्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर ‘बाळा’ची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, तर ‘बाळा’चे वडील विशाल अग्रवाल याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले. काँग्रेस आमदार तसेच पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे अपघाताबाबत विचारले असता ते म्हणाले की, पुण्यातील घटनेचे राजकारण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे, ती सर्व कारवाई पोलिसांनी उघडपणे केली आहे. इतकेच नाही तर बाल हक्क न्यायालयाने या प्रकरणात जो चुकीचा निर्णय दिला होता, त्या निर्णयाला मागे घेऊन तो निर्णय बदलण्यात आला आहे. पबचे मालक, मुलाचे वडील यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अतिशय कडक कारवाई झाली आहे. पण प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे, असा जो विरोधकांचा उद्योग सुरू आहे, तो योग्य नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावले आहे.

शालेय अभ्यासक्रमावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनाचे श्लोक महाराष्ट्रात वर्षानुवर्षे बोलले जातात, म्हटले जातात आणि ऐकले जातात. हे श्लोक अभ्यासक्रमात आहेत की नाही माहिती नाही, हे मी तपासलं नाही. पण विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न योग्य नाही. राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा समावेश करण्याचा विचार केला आहे. यावरुन आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहे. अनेक जण याला पाठिंबा दर्शवत आहे, तर अनेकांनी विरोध दर्शवला आहे.

डोंबिवली एमआयडीसीत कंपनीतील स्फोटाप्रकरणी भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या घटनेवरून ठाकरे गटाने जोरदार टीका केली होती. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंनी फाईलवर केलेला एक तरी निर्णय दाखवा. त्यांनी आजपर्यंत काहीच केलं नाही. कुठले उद्योग एका दिवसात हलवले जात नाही. उद्योग तिथून हलवले गेले पाहिजे यासंदर्भात बऱ्याच वर्षांपासून चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात काहीही केले नाही. त्यांची एक तरी फाईल दाखवा ज्यात त्यांनी काही निर्णय घेतला आहे. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व उद्योगांना पर्यायी जागा दिली पाहिजे. सरकार त्यासाठी पुढाकार घेईल, असे फडणवीस म्हणाले.