पुण्याच्या कल्याणीनगर येथे पोर्शे कारची धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे वातावरण प्रचंड तापलं आहे. एका धनिकाच्या अल्पवयीन मुलाने लायसन्स नसताना आणि दारूच्या नशेत असतानाही ही कार भरधाव वेगाने चालवून बाईकला धडक दिली, ज्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागलाय. आठवड्याभरापासून चालू असलेल्या या केसमध्ये रोज नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. आता तर नव्या दाव्याने खळबळच माजली आहे. हा अपघात घडला तेव्हा तो अल्पवयीन मुलगा नव्हे तर ड्रायव्हरच गाडी चालवत होता असा दावा त्याच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी केला आहे. कारमधील त्याच्या मित्रांनाही याला दुजोरा दिला आहे. मुलाला वाचवण्यासाठी हा दावा करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र पुणे पोलीस आयुक्तांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
पुणे हिट ॲंड रन प्रकरणात अग्रवाल यांच्या कार चालकावर चालवत असल्याचे सांगण्यासाठी दबाव होता, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे. येरवाडा पोलिस ठाण्यात आरोपी पिझ्झा पार्टी देण्यात आली नाही, असेही पोलिस त्यांनी या प्रकरणी स्पष्ट केले आहे.अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता तर चालक गाडी चालवत होता, अशा पद्धतीने केसची दिशा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा एक प्रकारचा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असून. त्यामुळं या प्रकरणी 201 अंतर्गंत कारवाई करण्यात येईल. सर्व दिशेने तपासदेखील करण्यात येत आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हूणन तसे कलम वाढवण्यात येणार आहे, असं अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरुवातीच्या तपासात तर हे देखील मान्य करण्यात आलं नव्हतं की आरोपीने मद्यप्राशन केलं आहे. पण, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे की ब्लड रिपोर्ट त्यांच्यासाठी इतकी महत्त्वाची नाही. आयुक्तांनी सांगितलं की, अल्पवयीन आरोपी पूर्णपणे शुद्धीत होता. त्याला माहिती होतं की जर तो मद्यप्राशन करुन गाडी चालवेल तर कोणाचा जीवही जाऊ शकतो. तसेच, आयुक्तांनी हेही सांगितलं की या प्रकणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत.
आम्ही आरोपीवर सर्वप्रथम 304 अ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये फक्त तीन वर्षांची शिक्षा आणि यामध्ये जामीन मिळण्याची मुभा होती. पण त्यानंतर आम्ही नंतर आरोपीवर 304 कलमातंर्गत गुन्हा दाखल केल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी पहिल्याच एफआयरमध्ये आरोपीवर 304 कलम का लावले नाही, पोलीस ठाण्यात आरोपीला कोणत्या सुविधा पुरवण्यात आल्या का, या सगळ्याची चौकशी करण्यात आल्या. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. आम्ही हे प्रकरण धसास लावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु आणि हे प्रकरण अंतिम निष्कर्षापर्यंत नेऊ, असे आश्वासन अमितेश कुमार यांनी दिले.
