दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग पुन्हा अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) १० वी ची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून नेहमीप्रमाणे कोकण विभाग आणि मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी नोंदणी वाढली होती. नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली. एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. कोकण विभागाने निकालाने बाजी मारली असून, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. त्यामुळे यंदा निकाल वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे. एकूण १८ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे. राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,३१,८२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,१४,८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ७९,७३२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटीची सुविधा निर्माण केली आहे. याचा फायदा जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत त्यांना होणार आहे. म्हणजेच दहावीचा विद्यार्थी एक किंवा दोन विषयात नापास झाला असेल तरी तो विद्यार्थी अकरावीसाठी प्रवेश घेऊ शकतो. या जूनमध्ये त्याला अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. मात्र, अकरावीचा निकाल लागण्यापूर्वी त्याने दहावीचे अनुत्तीर्ण राहिलेल्या एक किंवा दोन विषयात पास होणे गरजेचे आहे. या सुविधेमुळं विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. तसंच, शालेय शिक्षण मंडळाच्या या सुविधेमुळं या वर्षी २६ हजार विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यश शरद गोसावी यांनी दिली आहे.

नऊ विभागीय मंडळ निकाल-

पुणे : ९६.४४ टक्के
नागपूर : ९४.७३ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९५.१९ टक्के
मुंबई : ९५.८३ टक्के
कोल्हापूर : ९७.४५ टक्के
अमरावती : ९५.५८ टक्के
नाशिक : ९५.२८ टक्के
लातूर : ९५.२७ टक्के
कोकण : ९९.०१ टक्के