लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहे. मात्र लोकसभेच्या निकालाआधीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. तर हरिणायामधील विधानसभा 3 नोव्हेंबर रोजी विसर्जित होत आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या निवडणूक एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात. म्हणजेच राज्यात दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा मुदत संपते त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशीच नवी विधनासभा अस्तित्वात येणं आवश्यक असते. त्यानुसार हरियाणा राज्यात विधानसभा ही उशिरात उशिरा 4 नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे. 2009 सालापासून महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक एकाच वेळी होत आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र दोन्ही विधानसभांची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. या वर्षी दिवाळी ही 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे.
दिवाळीपूर्वीच निवडणूक होण्याची शक्यता अधिक असल्याने राजकीय पक्षांनाही तयारीला सुरुवात केली आहे. युती, आघाडीच्या चर्चा पडद्यामागे सुरु झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आज (27 मे रोजी) मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती असणार आहे. तसेच सर्व खासदार, आमदार आणि पक्षाचे सर्व सेलचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा आणि महानगरपालिकेच्या, निवडणुकीबाबत ही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसंच या बैठकीत काही पक्ष प्रवेश देखील होतील असं सांगितलं जात आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात मतदान सुरू असून 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठीदेखील मतदान झाले. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे, पण अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधीनसभेची मुदत 2 जून रोजू संपणार असल्याने त्या दोन्ही 2तारखेलाच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.
