पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांचा जीव घेतला. या प्रकरणात कारवाई सुरु आहे. या घटनेत तीन पिढ्या म्हणजेच अल्पवयीन आरोपी स्वत: त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल कोठडीत आहेत. या अपघातात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.
ब्लड रिपोर्ट आजून प्राप्त झाला नाही. परंतु, त्यामध्ये फेरफार केल्याचं उघड झालं आहे. याबाबत सर्व सीसीटीव्ही चेक केले आहेत. त्यानुसार कारवाई झाली आहे. तसंच, पुढेही जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. जे आरोपीच ब्लड सॅम्पल होत ते कचऱ्याच्या डब्यात फेकलं असा खुलासाही अमितेश कुमार यांनी केला आहे. यामध्ये श्रीहरी हरलोरने रक्ताचे नमुने बदलले अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
ससूनमध्ये रक्ताचा नमुना दिल्यानंतर पुणे पोलिसांनी औंध रुग्णालयातही अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना तपासणीसाठी दिला होता. हा नमुना दुर्घटनेच्या वीस तासांनंतर देण्यात आला होता. औंधमध्ये अल्पवयीन आरोपी आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल यांची डीएनए चाचणी करण्यात आली, जी मॅच झाली. मात्र ससून रुग्णालयात घेतलेला रक्ताच्या नमुन्याची डीएनए चाचणी आरोपीसोबत मॅच झालेली नाही. यानंतर तावरे आणि हरलोल यांनी रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल केल्याचं उघडकीस आलं. पुढे पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, दुसऱ्यांदा रक्ताचा नमुना अल्कोहोल तपासण्यासाठी घेण्यात आलेला नाही. तर यामुळे पहिल्या नमुन्यात गोंधळ झाल्याचं समोर आलं. दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या नावाखाली फॉरेन्सिक विभागाला तपासणीसाठी दिलेला नमुना कोणाचा होता, याचाही युद्धपातळीवर तपास सुरू आहे.
पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरु आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे.या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली असून श्रीमंताच्या मुलाला वाचविण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागल्याचे दिसत आहे. अपघात झाल्यानंतर ९ तासांनी अल्पवयीन आरोपीला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आले. पण या काळात मोठा गोंधळ उडाला होता, लोक संताप व्यक्त करू लागले होते. यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली.
