पुणे अपघात प्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. यासोबतच अग्रवाल कुटुंबाची जुनी काही प्रकरणंही समोर येत आहेत. यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पुढे येत अग्रवाल कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. अशातच, आता आणखी एक तक्रारदार पुढे आले आहेत. दत्तात्रय कातोरे अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय कातोरे यांनी केला आहे.
माझ्या मुलाचे अग्रवाल कुटुंबीयांनी लाखो रुपये थकवल्याने, त्याने आत्महत्या केली. त्याला आत्महत्या करण्यास यांनी प्रवृत्त केले, असं म्हणत तक्रारदार दत्तात्रय कातोरे यांनी तक्रार दिली आहे. 2000 ते 2005 दरम्यान कातोरे हे ब्रम्हा बिल्डर्स कंपनीकडे खोदाईचे काम करत होते. या कामाचे अग्रवाल कुटूंबाकडे 84 लाख 50 हजार रुपये बाकी होते. त्यातील 76 लाख 50 हजार मिळतील, असं सांगितलं होतं. त्यातील 8 लाख हे कोरोनाच्या आधीचं बिल होतं, ते पैसै मागण्यासाठी माझा मुलगा त्यांच्या ऑफीसमध्ये रेसिडन्सी क्लबला गेला होता. मात्र माझ्या मुलाला पैसे काही मिळाले नाहीत, पण त्याला उलटसुलट बोलून तेथून हाकलून लावण्यात आलं. त्यामुळे माझ्या मुलाने टेन्शनमध्ये येऊन घरी जाऊन त्याचं आयुष्य संपवलं, असे वडील दत्तात्रेय कातोरे यांनी सांगितलं.
पुणे पोलिसांच्या अहवालानुसार, अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आतापर्यंत दोन तक्रारदार पुढे आले आहेत. यापूर्वी शिवसेना नेते अजय भोसले यांनी पहिली तक्रार दाखल केली होती. अजय भोसले यांनी तक्रार केल्यानंतर अग्रवाल बिल्डर्सचं अंडरवर्ड कनेक्शनही समोर आलं होतं.
