सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.निकालातील धक्कादायक आकडेवारी आली समोर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दहावीच्या एकंदरित निकालात 1.98 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी या निकालामधून एक धक्कादायक आकडेवारीही समोर आली आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. म्हणजेच मातृभाषा मराठी असलेल्या राज्यामध्येच दहावीच्या मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी अधिक कठीण जात असल्याचं दिसत आहे. हजारो विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या विषयातच गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षिणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
महाराष्ट्रामध्ये एकूण 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत. मुंबई विभागामध्ये मराठी विषयाची परीक्षा देणाऱ्यांची संख्या 1 लाख 6 हजार 256 इतकी होती. मात्र प्रत्यक्ष परीक्षेला 1 लाख 5 हजार 322 जण हजर होते. त्यापैकी 1 लाख 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच मुंबई विभागात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 670 इतकी आहे.
दुसरीकडे इंग्रजी भाषेसंदर्भातील आकडेवारीवर नजर टाकल्यास असं दिसतं की इंग्रजी विषयाचा निकाल 98.12 टक्के इतका लागला. 3 लाख 59 हजार 229 विद्यार्थ्यांनी इंग्रजी (पहिली भाषा) परीक्षा दिली. त्यापैकी 3 लाख 52 हजार 491 जण उत्तीर्ण झाले. इंग्रजीमध्ये नापास होणाऱ्यांची संख्या 6 हजार 738 इतकी आहे. मराठीमध्ये नापास होणाऱ्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे.
