केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यानुसार, 25 जूनला मतदान आणि मतमोजणीही होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. पटेलांच्या जागी महायुतीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार असणार हे स्पष्ट आहे. आता या जागेवर राष्ट्रवादी कोणाची वर्णी लावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पटेल यांनी अजित पवार यांना साथ दिल्याने शरद पवार गटाने पटेल यांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठीच पटेल यांनी अलीकडेच झालेल्या राज्यसभेच्या जागेचा मार्ग पत्करला. यामुळे अपात्रतेच्या कारवाईतून त्यांची मुक्तता झाली. पटेल यांना 2030 पर्यंत राज्यसभेची मुदत मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने प्रतिष्ठेची केली होती. पण उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपने ही जागा पदरात पाडून घेतली होती. प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर साताऱ्याला खासदारकी देण्याचे अजित पवार यांनी सातारा दौऱ्यात जाहीर केले होते.
दरम्यान, साताऱ्याच्या जागेवरुन छत्रपती उदयनराजे भोसले निवडून आल्यास त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे. ही जागाही राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याचे समजते. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल जिंकल्यास रिक्त होणारी राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे पटेल यांनी आधीच जाहीर केले आहे. तर उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्यास साताऱ्याला एकाचवेळी तीन खासदार मिळण्याची शक्यता आहे.
