भाजपच्या चारशे पारच्या नाऱ्यामुळे लोकसभा निवडणुकांवर नकारात्मक परिणाम झाला, अशी स्पष्ट आणि सडेतोड भूमिका अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. भुजबळांच्या या मतावरुन माजी खासदार निलेश राणे चांगलेच खवळल्याचे दिसत आहे. श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं? असा प्रश्न निलेश राणे यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन विचारला आहे. त्यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे.
श्री छगन भुजबळांना आवरलं पाहिजे. मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं??? मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही. नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे, युती आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही. आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उठसूट कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असूनसुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काल पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना एक वक्तव्य केलं होतं. त्यावरुन आता महायुतीमधील विसंवादाचे सूर समोर येऊ लागले आहेत. देशात आता फक्त लोकसभा निवडणुकीसाठी एका टप्प्याच मतदान बाकी आहे. त्यानंतर 4 जूनला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. त्याआधीच महायुतीमधील मतभेद दिसू लागले आहेत. काल पक्षाच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे” “लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, आम्हाला एवढ्या जागा हव्या हे त्यांना सांगाव लागेल. 80-90 जागा मिळाल्या, तर 50-60 निवडून येणार. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या, असं होता कामा नये. त्यामुळे आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले होते.
भुजबळांच्या प्रतिक्रियेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
विधानसभा निवडणुकीला 80 ते 90 जागा देण्याच्या शब्दाची भाजपाला आतापासूनच आठवण करुन द्यावी, अशी अपेक्षा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. भुजबळांच्या या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच, भाजपा हा मोठा भाऊ असल्याने अधिक जागा लढेल, मात्र मित्र पक्षांचा सन्मान ठेवला जाईल, असं उत्तर दिलं. लोकसभेच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गटाच्या वाटल्याला चारच जागा आल्याचं शल्य बोलून दाखवत भुजबळांनी विधानसभेला अशी खटपट करायला लागू नये अशी अपेक्षा आपल्या भाषणात व्यक्त केली. आता भुजबळांच्या याच आक्रमक भूमिकेवर निलेश राणेंनी त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
