पोर्श प्रकरणातील रक्ताचा नमुना बदलण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरांवर दबाव; 2 तासात 15 कॉल्स

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. श्रीमंत अल्पवयीन मुलाने भरधाव कारने दोघांचा जीव घेतला. सुरुवातीला सर्वच यंत्रणा त्याला वाचविण्यासाठी धडपड करु लागली. याविषयी आवाज वाढला. देशभरातून संताप व्यक्त झाल्यानंतर बाल न्याय मंडळासह पोलिसांनी भूमिका बदलल्या. आता अजून एक खुलासा समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर मुलाचा रक्त नमुना बदलण्यासाठी आरोपी विशाल अग्रवाल याने सरकारी डॉक्टरांना दोन तासांत कॉलवर कॉल केल्याचे स्पष्ट झाले. त्याने डॉक्टरवर दबाव टाकल्याचे दिसून येते.

तपासादरम्यान आरोपीचे रक्ताचे नमुने घेण्यापूर्वी डॉ.अजय तावरे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सॲप आणि फेसटाइमवर चौदा कॉल आणि एक सामान्य कॉल झाल्याचे समोर आले. हे फोन कॉल्स सकाळी साडेआठ ते १०.४० दरम्यान करण्यात आले असून सकाळी ११ वाजता रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

19 मे रोजी झालेल्या अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात बदल झाल्याचा खुलासा केला होता. या खुलाशानंतर शासकीय रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली. तिघांवर आरोप आहे की, पैशाच्या लालसेपोटी त्यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले होते, त्यामुळे कार चालकाने दारू प्यायली होती याची खात्री होऊ शकली नाही.

कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघात 19 मे रोजी घडला. दुसऱ्या दिवशी आरोपीचा रक्त नमुना बदलल्याचा खुलासा पोलिसांनी केला होती. प्रकरणात सरकारी रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील मुख्य डॉक्टर अजय तवारे आणि डॉ. श्रीहरी हळनोर, अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. पैशांच्या बदल्यात रक्त नमुना बदल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने दारुचे सेवन न केल्याचे सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभाग डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांच्या निलंबनाबाबत लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान मंगळवारी डॉक्टर तावरेच्या घराची पोलिसांकडून झडती घेण्यात आली. कॅम्प परिसरातील गीता सोसायटीमध्ये डॉक्टर तावरे राहतो. त्याच्या घरातून महत्त्वाची कागदपत्र आणि साहित्य दत्त करण्यात आल्याच कळतंय.